साकेगावातील प्रकाश शेगरची एमएसएफमध्ये निवड; राष्ट्रवादीकडून सत्कार!


साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साकेगाव येथील एका गरीब कुटुंबातील तरुण, प्रकाश अर्जुन शेगर, याची नुकतीच महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड झाल्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या यशाबद्दल त्याला गौरवण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) साकेगावतर्फे एका भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेजवळील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात साकेगावचे माजी प्रभारी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शकील दादा पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रकाश शेगर यांचा सत्कार केला. यावेळी साकेगावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल दादा पाटील, साकेगाव ग्रामीण पतसंस्थेचे संचालक विजय दादा बावस्कर, माजी सरपंच विजय दादा पाटील, चंद्रकांत कोलते, ग्रामपंचायत सदस्य धनराज दादा भोई, राजेंद्र दादा भोळे, संतोष दादा पाटील, दीपक चौधरी, डॉ. कैलास ठाकरे, भिवा शेगर आणि गावातील अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश शेगरने प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. त्याच्या निवडीमुळे गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल आणि ते शिक्षण व नोकरीसाठी अधिक प्रयत्न करतील, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. साकेगावच्या या सुपुत्रावर संपूर्ण गावातून कौतुकाचा वर्षाव होत होता, ज्यामुळे हा सत्कार सोहळा गावाच्या एकोप्याचे आणि अभिमानाचे प्रतीक बनला.