धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील दादाजी नगरात राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ५ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामलाल सिताराम माळी वय ५५ रा. दादाजी नगर, धरणगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील दादाजी नगरात रामलाल माळी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. शनिवारी ५ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते रेल्वेस्थानकावर रेल्वे ओलांडत असतांना त्यांना धावत्या रेल्वेचा धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह धरणगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.