दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार संघटनेचे नायगाव ग्रामपंचायतीला निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी दिलीप तडवी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, आजपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या ५ टक्के निधीचा लाभ, घरकुल योजनेत ५० टक्के घरपट्टी माफी व व्यवसायासाठी २७० स्के.फुट जागा या महत्त्वाच्या सुविधांचा लाभ मिळालेला नाही. याबाबत शासनाने आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देऊन दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर हक्काच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. या प्रसंगी ग्रामविस्तार अधिकारी दिलीप अहमद तडवी, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रतिक वासुदेव पाटील, बापू काशिनाथ पाटील, लोकेश पुंडलिक पाटील, सतीश पाटील, तुळशिराम पाटील, भावेश पाटील, साहेबराव पाटील, गरबड दामू पाटील, कुसुमताई माधवराव पाटील, निर्मलाबाई रमेश पाटील, निर्मलाबाई शांताराम पाटील, हुसेन तडवी, सागर पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेमध्ये नव्याने चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष हरी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content