यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारने विधानसभेत दिनांक २४ मार्च २०२५ रोजी ऐतिहासिक निर्णय घेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, असा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसंमतीने मंजूर केला. या ऐतिहासिक घडामोडीनंतर संपूर्ण राज्यभरातून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक होत असून, यावल तालुक्यातील साकळी गावात विशेष कार्यक्रम घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
साकळी येथील श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र माळी महासंघ (शाखा साकळी) आणि भूमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त “धन्यवाद देवेंद्रजी” या अभिनंदन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शेकडो नागरिकांनी, सर्व जाती-धर्मांतील बांधवांनी सहभाग घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिकरित्या आभारपत्रे लिहिली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, विधीवत श्रीफळ फोडून, ढोल-ताशांच्या गजरात “जय ज्योती, जय क्रांती” या घोषणांनी करण्यात आली.
या संकल्पनेचे शिल्पकार भूमी फाउंडेशनचे डॉ. सुनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजसुधारणा, शिक्षण, स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय होते. जनतेने त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली होती, ती लोकमान्यता होती. आता भारतरत्न पुरस्कारामुळे त्यांना राजमान्यता मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनभावनेचा आदर केला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, महाज्योती योजनेसारख्या उपक्रमांमुळे त्यांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले. या उपक्रमात श्री संत सावता महाराज बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते, महाराष्ट्र माळी महासंघ साकळी शाखेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.