Home Cities जळगाव जळगाव महापौरांकडून ‘ॲक्शन मोड’; मेहरून स्मशानभूमीची पाहणी करून दिल्या कडक सूचना

जळगाव महापौरांकडून ‘ॲक्शन मोड’; मेहरून स्मशानभूमीची पाहणी करून दिल्या कडक सूचना


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  मेहरूण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळील स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत वाढलेल्या तक्रारींची दखल घेत जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (२० एप्रिल) सकाळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या पाहणीनंतर स्मशानभूमीच्या स्वच्छता, सुरक्षाव्यवस्था आणि सौंदर्यकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.

सकाळी महापौरांनी स्मशानभूमी परिसरात भेट देत प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक आजी-माजी नगरसेवकांनी परिसरातील कचरा, अस्वच्छता आणि नियमित साफसफाई न होण्याबाबत तक्रारी मांडल्या. तसेच स्मशानभूमीतून वाहतूक सुरू असल्याने परिसराच्या पवित्रतेला बाधा येत असल्याचे निदर्शनास आणून देत रस्ता बंद करून गेट बसवण्याची मागणी करण्यात आली.

महापौर दीपमाला काळे यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले. स्मशानभूमीच्या दोन्ही बाजूंना संरक्षक गेट बसवून हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यामुळे स्मशानभूमीची सुरक्षितता आणि पवित्रता राखण्यास मदत होणार आहे.

या पाहणीदरम्यान उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सदस्य गणेश सोनवणे, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, रितिक ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते आशुतोष पाटील तसेच माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून स्मशानभूमीच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

पाहणीनंतर दुपारी महापौर दालनात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मशानभूमी परिसरातील कचरा तातडीने हटवून संपूर्ण स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मेहरूण परिसरातील सुरू असलेल्या सौंदर्यकरणाच्या कामांना गती देण्याचे निर्देशही विकासकांना देण्यात आले.

महापौरांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत कामकाजात विलंब सहन केला जाणार नाही. स्मशानभूमी परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या निर्णयांमुळे मेहरूण परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत असून स्मशानभूमीचा कायापालट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिसरात स्वच्छता आणि सुरक्षेचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

 


Protected Content

Play sound