यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात मरीमातेच्या पारंपरिक बारागाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली असून शहरात श्रद्धा आणि परंपरेचे अनोखे दर्शन घडले.
यावल ते सातोद-कोळवद मार्गावरील जिल्हा परिषद उर्दू शाळेपासून ते शहरातील मुख्य बुरूज चौकापर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मार्गावर बारागाड्या ओढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाही ती मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमादरम्यान परिसरात ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुरात वातावरण भारावून गेले होते.

या सोहळ्यात भगत सचिन कोळी यांनी बारागाड्या ओढण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांना बगले म्हणून रोहित कोळी आणि तन्मय बारी यांनी साथ दिली. या तिघांनीही पारंपरिक पद्धतीने विधी पूर्ण करत बारागाड्या ओढल्या. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक सहभाग यामुळे कार्यक्रम अधिकच आकर्षक ठरला.
बारागाड्या ओढण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण मार्गावर गर्दी उसळली होती आणि वातावरण भक्तिमय झाले होते.
कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने दक्षता घेतल्यामुळे सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडला.



