यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर परिसरात सायंकाळच्या सुमारास झालेल्या अनपेक्षित गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे ८ ते १० मिनिटे जोरदार गारांचा मारा झाल्यानंतर हलकासा पाऊसही झाला. यामुळे परिसरातील केळी, कपाशी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या आपत्तीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक चिंतेत असून तातडीने मदतीची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाची गंभीर दखल घेत आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी तात्काळ प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार अमोल जावळे यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना प्रशासनातील संबंधित यंत्रणांना अलर्ट केले असून, शेतकऱ्यांना योग्य आणि तत्काळ मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाकडून आता पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, आमदार जावळे यांनी पुन्हा एकदा आपल्या शेतकरीहितैषी भूमिकेची प्रचिती दिली आहे.