झाले. . .अमोल जावळे यांचे राजकीय लॉंचींग झाले !

फैजपूर, ता. यावल-निलेश पाटील | गेल्या सुमारे तीन वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची निस्वार्थीपणे सेवा करत पडद्याआडून सूत्रे हलविणार्‍या अमोल हरीभाऊ जावळे यांच्याकडे यावल-रावेर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदाची जबाबदारी टाकण्यात आल्याने त्यांचे अधिकृतपणे राजकीय लॉंचींग झाल्याचे मानले जात आहे.

माजी खासदार, माजी आमदार तथा भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे म्हणजे जनहिताची कळकळ असणारे साधे-सोज्वळ व्यक्तीमत्व ! जल-जमीन आणि जंगलावर प्रेम करणारा आणि पक्षाने दिली ती जबाबदारी कोणतीही कुरकुर न करता सांभाळणार्‍या या नेत्यावर राजकीय कारकिर्दीत मोठा अन्याय झाला. २०१४ साली हातातोंडाशी केंद्रीय मंत्रीपदाचा घास असतांना ऐन वेळेस तिकिट कापण्यात आले. तर २०१९ साली भाजपमधीलच एका गटाने त्यांना पराभूत करण्यात हातभार लावला. कसे तरी कृषी संशोधन खात्याचे पद मिळाले असतांना सरकार बदलल्याने ते पद देखील गेले. आणि भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून नवीन जोरदार आगेकूच सुरू असतांना कोविडने या नेत्याचा बळी घेतला.

१६ जून २०२० रोजी हरीभाऊ जावळे अनंतात विलीन झाले. यानंतर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ती त्यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्यावर. कुटुंबावरील वज्राघात विसरून त्यांनी एकीकडे कुटुंबाला तर सावरलेच पण दुसरीकडे हरीभाऊंचे समर्थक आणि एकूणच स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांना देखील आधार दिला. हरीभाऊंप्रमाणेत ते देखील संघाच्या शिस्तीत तयार झाले असल्याने कोणताही गाजावाजा न करता पक्षाचे काम सुरू केले. मात्र त्यांनी कोणतेही पद घेतले नाही, तशी त्यांनी इच्छा देखील व्यक्त केली नाही.

महाविकास आघाडीच्या कालखंडात झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या अन्य नेत्यांनी मैदानातून माघार घेतली तरी त्यांनी त्यांचे समर्थक गणेश नेहेते यांना रिंगणात उतरवून लढविले. यात त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी तगडी फाईट दिली. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत यावल-रावेर पट्टयातून महायुतीच्या उमेदवारांना सर्वाधीक लीड मिळाल्याने ते खरे चर्चेत आले. तर अलीकडेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दणदणीत यश संपादन करून ते ‘किंगमेकर’ ठरले.

यानंतर आता भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर यावल-रावेर विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे पहिले पद ठरणार आहे. अर्थात, या माध्यमातून त्यांचे राजकीय लॉंचींग झाले आहे. उच्च शिक्षीत असणारे अमोल जावळे हे कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत. आता भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असली तरी त्यांच्या समोर अनेक आव्हाने देखील आहेत. हरीभाऊ जावळे यांच्या मार्गात काटे बनणारे त्यांना देखील अडसर बनू शकतात. यावर मात करून त्यांना पुढे आगेकूच करावी लागणार आहे. यात नेमके काय होणार ? याचे उत्तर हे येणारा काळच ठरविणार आहे.

Protected Content