नारायण राणेंना अटकेच्या शक्यतेने राजकीय वातावरण तापले

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा अतिशय अपमानास्पद उल्लेख केल्याचे प्रकरण आता तापले असून यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांच्या पथकाने राणेंना अटकेच्या हालचाली सुरू केल्या असल्यामुळे आजचा दिवस मोठ्या राजकीय घडामोडींचा असेल असे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अवमान केल्याचे प्रकरण आता प्रचंड वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यावरून महाड, नाशिक आणि पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली. यानंतर नाशिक पोलिसांकडून नाारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले. राणे राज्यसभेचे खासदार असल्यानं त्यांच्या अटकेवेळी प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राणेंना अटक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना देण्यात येईल. तर दुसरीकडे संभाव्य कारवाईच्या विरोधात नारायण राणे हे न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तसेच ते स्वत:ला अटक करवून घेण्याचीही शक्यता आहे. एकंदरीत पाहता आजचा दिवस हा राज्याच्या राजकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

Protected Content