
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात श्री क्षेत्र अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी झाले होते. जय जय रघुवीर समर्थच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

संध्याकाळी ६ वाजता धनश्री टॉकीज, बोरवाल गेट येथून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी यावलच्या नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांनी सहपत्नीक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक बोरवाल गेट, गवत बाजार, अपना बाजार, महाजन टी डेपो, चावडी रोड, कोर्ट रोड, रेणुकादेवी मंदिर आणि व्यास मंदिर रोड मार्गे शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे पोहोचली.
प्रा. मुकेश येवले यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाल्यानंतर आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने स्वामी भक्तांनी दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा लाभ घेतला.
दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ वाजता पालखीचा फैजपूरकडे प्रस्थान सोहळा पार पडला. पालखीच्या स्वागतासाठी आणि निरोपासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
विशेष म्हणजे मागील १७ वर्षांपासून प्रा. मुकेश येवले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने या पालखी सोहळ्याचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या धार्मिक परंपरेमुळे यावल तालुक्यातील स्वामी भक्तांना दरवर्षी एकत्र येण्याची आणि भक्तीभाव व्यक्त करण्याची संधी मिळत आहे.
पालखी मार्गावरील विविध चौकांमध्ये भाविकांच्या वतीने थंड पाणी, दूध आणि सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. सेवाभावी उपक्रमांमुळे धार्मिक वातावरणाला अधिकच रंगत आली. शहरातील नागरिकांनीही या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव घेतला.



