
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खगोलप्रेमींसाठी आजची (९ जून २०२६) संध्याकाळ विशेष ठरणार आहे. सूर्यमालेतील दोन तेजस्वी ग्रह शुक्र (व्हीनस) आणि गुरु (ज्युपिटर) आज एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्याचे दृश्य जळगावसह महाराष्ट्र आणि देशभरातून उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. खगोलशास्त्रात या घटनेला ‘ग्रहांची युती’ (Conjunction) असे म्हटले जाते. या दुर्मीळ दृश्याला जागतिक स्तरावरील विज्ञान अभ्यासकांनी ‘कॉस्मिक किस’ असे आकर्षक नाव दिले आहे.

विशेष म्हणजे, हे ग्रह प्रत्यक्षात एकमेकांच्या जवळ नसून पृथ्वीवरून पाहताना एका दृष्टीरेषेत आल्यामुळे ते अगदी शेजारी असल्याचा भास निर्माण होतो. शुक्र ग्रह पृथ्वीपासून सुमारे १८ कोटी किलोमीटर अंतरावर असताना गुरु ग्रह तब्बल ९० कोटी किलोमीटर दूर असणार आहे. मात्र आकाशातील भौमितिक मांडणीमुळे ही नेत्रदीपक युती अनुभवता येते.
खगोलशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला एकही नैसर्गिक उपग्रह नाही, तर गुरु ग्रह हा सूर्यमालेतील उपग्रहांचा राजा मानला जातो. सध्याच्या माहितीनुसार गुरुला ९५ अधिकृत चंद्र आहेत. साध्या बायनॉक्युलर किंवा लहान दुर्बिणीद्वारे निरीक्षण केल्यास गुरुचे प्रसिद्ध आयो, युरोपा, गॅनिमिड आणि कॅलिस्टो हे गॅलिलियन चंद्रही पाहता येऊ शकतात.
जळगाव परिसरात आज संध्याकाळी आकाश मुख्यत्वे निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने या खगोलीय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध होणार आहे. खगोल अभ्यासक व पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी नागरिकांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोनातून या निसर्गाच्या अद्भुत दृश्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
आज संध्याकाळी घराच्या गच्चीवरून, मोकळ्या मैदानातून किंवा पश्चिम क्षितिज स्पष्ट दिसणाऱ्या ठिकाणाहून हे विहंगम दृश्य अनुभवण्याची संधी जळगावकरांना मिळणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही एक संस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.



