पंतप्रधानांच्याहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

धुळे प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले असून काही कामांचे भूमिपुजनदेखील करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ मंत्री व नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे येथील दौर्‍यावर आले होते. यानिमित्त येथील गोशाळा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंसाधन, दळणवळण, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार रावसाहेब दानवे, ए. टी. पाटील, डॉ. हीनाताई गावित, हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार एकनाथराव खडसे, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा (जम्मू- काश्मीर) जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणीतून केली. ते म्हणाले, आठे जमेल खानदेशना तमाम भाऊ- बहिनीसले मना मन:पूर्वक नमस्कार. तुमी इतला लोके, माले आशीर्वाद देवाले उनात. मी तुमना आभारी शे. खानदेशना लोकेसना जीव्हाळाना प्रकल्प मा मी सहभागी व्हयनू येना माले आनंद शे…

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते बळिराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत २४०७.६७ कोटी रुपये खर्चून होणार्‍या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा योजनेचे भूमिपूजन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्पाचा (अक्कलपाडा) लोकार्पण सोहळा, धुळे- नरडाणा नवीन रेल्वे मार्ग व जळगाव- मनमाड तिसरा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन, धुळे महानगरपालिकेसाठी भारत सरकारच्या ङ्गअमृतफ योजनेंतर्गत अक्कलपाडा धरणापासून धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक एकचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भुसावळ- वांद्रे टर्मिनस दरम्यान धावणार्‍या खान्देश एक्स्प्रेस, उधना- नंदुरबार व उधना- पाळधी मेमू ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, धुळे- नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाला जोडणारा आहे. ९ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्याचा मुंबईसह देशालाही लाभ होईल. तसेच जळगाव- मनमाड दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळून रोजगाराची निर्मिती होईल. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे व्यापार वाढेल. तसेच मुंबई-कोलकाता दरम्यान १५० किलोमीटर अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांनाही हा मार्ग सोयीचा होणार आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, सुलवाडे बॅरेजमुळे तापी नदी भर उन्हाळ्यात दुथडी भरलेली असते. या पाण्याचा शेतकर्‍यांना लाभ व्हावा म्हणून सुलवाडे- जामफळ- कनोली योजनेसाठी पाठपुरावा केला. या योजनेमुळे सुमारे दोनशे गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. तसेच मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी २०१४ पासून प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी प्रधानमंत्री श्री.मोदी, तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content