मुंबई-वृत्तसेवा । महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “लोकांनी त्यांची ठासली आहे, आमची काय ठासतायत ते बघा,” असा घणाघात करत त्यांनी महायुतीच्या महिला मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राऊत म्हणाले की, काल काढण्यात आलेल्या महिला मोर्चात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. “नारी शक्ती त्यांच्या बाजूने नाही. ज्या दिवशी महिलांना दिले जाणारे 1500 रुपये बंद होतील, तेव्हा खरी ताकद कोणाकडे आहे ते कळेल,” असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. “ज्या राज्यात आपण राहतो, तिथली भाषा येणे गरजेचे आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.
महिला आरक्षण लागू करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांकडे असताना मोर्चा काढण्याची गरज काय, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी भाजपवर टीका केली. “हे लागू करायचे की नाही, यासाठी Donald Trump किंवा Vladimir Putin यांना विचारायचे आहे का?” असा उपरोधिक प्रश्न त्यांनी केला.
दरम्यान, मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत अडकलेल्या एका महिलेने संताप व्यक्त करत मंत्री Girish Mahajan यांना थेट सुनावले. “लोकांना त्रास देण्यापेक्षा मैदानात मोर्चा घ्या,” असे तिने स्पष्टपणे सांगितल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.



