कापसाच्या पिक विम्याची रक्कम अदा करा ! : कॉंग्रेसची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| जिल्ह्यातील २७ मंडळातील २१ दिवसापेक्षा पावसाचा जास्त खंड तुटवडा झाल्यामुळे कापूस पिकाचे अग्रीम विमा वाटप करावे अशा आशयाचे निवेदन कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२३ मध्ये संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सरासरी पर्जन्यमानापेक्षा २५ टक्के पाऊस कमी झालेला आहे. त्याचा सर्वच पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. खरीप हंगामाचे उत्पादन २० टक्यापेक्षा कमी आलेले आहे. जिल्हा लवकरात लवकर दुष्काळी जाहीर होणे गरजेचे असताना कुठलीच ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही.

यात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात २७ मंडळे ज्यात पावसाचा २१ दिवसापेक्षा जास्त खंड आहे अश्या मंडळात अग्रीम पिक विमा वाटप लवकरात लवकर दिवाळीपूर्वीच होणे जरुरीचे होते. परंतु पिक विमा कंपनी (ओरिएन्टल इन्शुरन्स) मुद्दाम हेतु पुरस्कर उशिर करीत आहे. व खोटे नाटे अपील करीत आहे. विमा कंपनीचे जिल्हा लेव्हलवर तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील फेटाळले गेलेले आहे. विमा कंपनीला आदेश देऊन लवकरात लवकर कापूस पिकाचाअँग्रीम पिक विमा वाटप सुरु करावा. शेतक-यांना आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

या निवेदनावर कॉंग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अमळनेर बाजार समितीचे संचालक डॉ. अनिल नथ्थू शिंदे, नितीन बापूराव पाटील, शरद पांडुरंग पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Protected Content