२० डिसेंबर पर्यंत रस्ता पूर्ण करा : आ. अनिल पाटलांचा कंत्राटदाराला इशारा

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील दगडी दरवाज्याच्या समोरच्या रस्त्याचे काम २० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या मार्गाच्या कंत्राटदाराला दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, हायब्रीड अम्युइटी अंतर्गत धुळे रस्त्याचे काम अंत्यत संथगतीने सुरू असताना व त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून शहरातील रस्त्याची वाट लागत आहे. याची दखल घेऊन आ.अनिल भाईदास पाटील (MLA Anil Bhaidas Patil, Amalner) यांनी धुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन दगडी दरवाजा समोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आणि शहरातील पर्यायी रस्त्याची डागडुजी करण्यासाठी २० डिसेंबर पर्यंत अलटीमेटम ठेकेदारास दिला आहे. यामुळे ठेकेदाराने गांभीर्याने घेऊन कामाचा वेग वाढवीला आहे.

अमळनेर ते धुळे या प्रमुख रस्त्याचे काम होत असून प्रामुख्याने दगडी दरवाजा ते आर. के. नगर पर्यंतचे काम अनेक महिन्यांपासून अतिशय संथगतीने झाल्याने शहर वासीयांची मोठी गैरसोय झाली आहे. याशिवाय हे काम सुरू असतानाच दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने धोका नको म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे पर्यायी रस्ता म्हणून गांधलीपुरा मार्गाचा वापर सुरू झाला. परंतु येथून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सुभाष चौक, स्टेशन रोड, कचेरी रोड आदी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे.

तसेच दररोज होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक अक्षरशः वैतागून धुळे रस्ता कधी सुरू होतोय याची वाट पाहत आहे. सुदैवाने दगडी दरवाजा प्रश्‍न आ.अनिल पाटील व माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या समन्वयाने सुटून पालिकेकडे ते हस्तांतरीत झाल्याने नूतनीकरणासाठी पालिकेने निधी मंजूर केला असून याठिकाणी धोकेदायक बुरुज नुकतेच पाडण्यात आले आहेत. आता केवळ सुशोभीकरणाचे काम तेवढे बाकी आहे. यामुळे दरवाजा समोरील राहिलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असा आग्रह आमदार अनिल पाटील यांनी धरला होता, परंतु तरी देखील ठेकेदाराकडून कामाबाबत विलंब होत असल्याने आ पाटील यांनी तातडीने धुळे बांधकाम कार्यालय गाठून अधिकारी व ठेकेदारा सोबत तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी आक्रमक भूमीका घेतली. ते म्हणाले की, जनतेचा संयम आता संपला असून वाहतुकीच्या कोंडीमुळे होत असलेला दररोजचा त्रास आता असह्य होत आहे. यामुळे आता कोणतीही सबब चालणार नसून कोणत्याही परिस्थितीत येत्या २० डिसेंबर पर्यंत धुळे रस्त्याचे दगडी दरवाजा सह संपूर्ण काम वेगाने पूर्णत्वास आणून हा रस्ता वाहतुकीसाठी खुलाच झाला पाहिजे. याशिवाय अवजड व जादा वाहतुकीमुळे शहरातील रस्त्याची जी दैनावस्था झाली त्याचीही डागडुजी २० डिसेंबर पर्यंतच करून हा रस्ताही वाहतुकयोग्य झाला पाहीजे अश्या स्पष्ट सूचना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, ठेकेदाराने ही अट मान्य करीत जोमाने ते कामाला लागले आहेत.

दरम्यान, आ.अनिल पाटील यांनी दगडी दरवाजा समोर वेगाने सुरू असलेल्या रस्ता कामाची स्वतः पाहणी करून कामाबाबत काही सूचना देखील केल्या,तसेच दगडी दरवाजाची देखील त्यांनी पाहणी केली,यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, बाजार समितीचे माजी संचालक अनिल शिसोदे, देविदास देसले, व्यापारी आघाडीचे दिनेश कोठारी, सचिन बेहरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Protected Content