धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव बसस्थानकावर आज सकाळी पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एरंडोल आगाराच्या ढिसाळ कारभारामुळे धरणगावहून पंढरपूरसाठी सुटणारी बस एरंडोलमधूनच पूर्ण भरून आल्याने धरणगाव येथील प्रवाशांना जागा मिळाली नाही, त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सकाळी सहा वाजता धरणगाव-पंढरपूर बसचे आगमन होणार होते. विशेष म्हणजे, धरणगावहून पंढरपूरसाठी ही बस नव्याने सुरू करण्यात आली आहे. मात्र, एरंडोल डेपोने या बसमध्ये एरंडोलहूनच जास्त प्रवासी भरल्याने धरणगाव येथील प्रवाशांना बसमध्ये चढताही आले नाही. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
‘आम्ही सकाळी लवकर येऊन बसची वाट पाहत होतो, पण एरंडोलमधूनच बस पूर्ण भरून आली. धरणगावहून ही बस सुरू झाली असताना एरंडोल डेपोचा हा कारभार पूर्णपणे चुकीचा आहे,’ असे संतप्त प्रवाशांनी सांगितले. काही प्रवाशांनी तर धरणगाव बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून एरंडोल आगार प्रमुख निलेश बेडकुडे यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी तातडीने दुसरी बस धरणगावला पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर सर्व प्रवासी त्या बसमधून पंढरपूरकडे रवाना झाले. या घटनेमुळे एरंडोल आगाराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.