जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काही पेट्रोल पंप अचानक बंद दिसू लागल्याने वाहनधारकांमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाईची भीती निर्माण झाली होती. परिणामी, सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळाले. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात अचानक काही पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याच्या चर्चांना उधाण आल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याच्या भीतीने मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे शहरातील कार्यरत पेट्रोल पंपांवर तासन्तास प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर आली. या परिस्थितीमुळे सोशल मीडियावरही विविध अफवा वेगाने पसरू लागल्या.

नागरिकांमध्ये वाढत असलेली घबराट लक्षात घेता ‘लाईव्ह ट्रेंड्स’च्या टीमने शहरातील विविध पेट्रोल पंपांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक पंपांवर इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असल्याचे दिसून आले. वाहनांना सुरळीतपणे पेट्रोल आणि डिझेल दिले जात होते. काही ठिकाणी गर्दी असली तरी इंधन संपल्याची परिस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या गोंधळामागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी ‘लाईव्ह ट्रेंड्स’ने जळगाव जिल्हा पेट्रोल आणि डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडेच ‘ॲडव्हान्स पेमेंट’ प्रणाली लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार जे पेट्रोल पंप चालक आगाऊ रक्कम भरत आहेत, त्यांना इंधनाचा पुरवठा नियमितपणे केला जात आहे.
प्रकाश चौबे यांनी पुढे स्पष्ट केले की, काही पंप चालकांनी तांत्रिक अडचणींमुळे किंवा आर्थिक कारणांमुळे आगाऊ पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे संबंधित पंपांना कंपन्यांकडून तात्पुरता साठा मिळत नसल्याने काही पंप बंद दिसत आहेत. याचा अर्थ जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा आहे असे अजिबात नाही. केवळ आर्थिक व्यवहार आणि नवीन पेमेंट प्रणालीमुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
यावेळी त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. “जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. केवळ काही पंपांवर पुरवठा तात्पुरता प्रभावित झाल्यामुळे इतर पंपांवर गर्दी वाढली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण घाबरून जाऊ नये,” असे प्रकाश चौबे यांनी स्पष्ट केले.
एकूणच पाहता, जळगाव जिल्ह्यातील इंधन पुरवठा साखळी सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे. काही पंपांवरील तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासन आणि डीलर्स असोसिएशनने परिस्थिती स्पष्ट केल्यानंतर नागरिकांनी संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



