जेईई-नीटसाठी मातंग समाजातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग आणि तत्सम समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) यांच्यातर्फे जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षांसाठी खास मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण राज्यातील खाजगी व नामांकित संस्थांमार्फत दिलं जाणार असून, यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.

या प्रशिक्षणासाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या सात प्रमुख शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. यामुळे राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याची आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी 2025 साली 10 वी उत्तीर्ण झालेले मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी पात्र आहेत. हे प्रशिक्षण दोन वर्षांचे असून, 2025 ते मे 2027 या कालावधीत हे मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे होणार असून, ज्यांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे, असे उमेदवारच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

या संदर्भात आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 जुलै ते 30 जुलै 2025 या कालावधीत https://cpetp.barti.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

राज्यातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या मार्गातली ही योजना एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे. आर्टीच्या या उपक्रमामुळे गुणवत्ताधारक आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि साधनसुविधा विनामूल्य मिळणार आहेत.