मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामपंचायतीच्या कारभारातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वार्ड क्रमांक तीन आणि चारमधील सांडपाण्याच्या समस्या विकोपाला गेल्या असून, नागरिकांना दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि आरोग्यविषयक गंभीर त्रासांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
चांगदेव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र. तीन मधील रहिवाशांनी गेल्या काही महिन्यांपासून साचलेल्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांविरोधात ग्रामपंचायत, विस्तार अधिकारी आणि बीडिओ यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप कुठलाही ठोस निर्णय किंवा कृती झालेली नाही. याउलट, ग्रामसेवक व सरपंच यांनी फक्त तोंडी आश्वासने देत नागरिकांची दिशाभूल केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सदर भागात वारंवार सांडपाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या झाडाझुडपांमुळे साप, विंचू आणि इतर विषारी किटकांचा वावरही वाढला आहे. याशिवाय, पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे घरोघरी पाणी शिरत असून, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून, मलेरिया, डेंग्यू, जुलाब यांसारख्या आजारांचा धोका वाढत आहे.
ग्रामपंचायतने याआधी संपूर्ण गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याचा योग्य विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही. गटारी मंजूर झाली असल्याचे सांगून वेळकाढूपणाचा खेळ सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर लवकरच नागरिक आक्रोश करत ग्रामपंचायतीसमोर आंदोलन छेडतील.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, विस्तार अधिकारी, पंचायत समिती बीडिओ आणि जिल्हा परिषद सीओ यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये आणि तातडीने योग्य पावले उचलून समस्येचे निराकरण करावे, ही नागरिकांची कळकळीची मागणी आहे.