जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर आणि रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असताना, जळगाव आरपीएफने धडक कारवाई करत दोन सराईत मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कामगिरी बजावत, गुरुवार २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या ताब्यातून ५ महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. अशी माहिती आरपीएफ विभागाने शनिवारी २८ जून रोजी दुपारी २ वाजता प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिखन नवल पाटील या प्रवाशाचा १ लाख ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी हा मोबाईल बदनेरा-नाशिक मेमो ट्रेनमध्ये चढत असताना जळगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून मंगळवारी १७ जून रोजी चोरीला गेला होता. या प्रकरणी जीआरपी भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरपीएफ इन्स्पेक्टर अमित कुमार यादव यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले. फुटेजच्या मदतीने एका संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. गुरुवारी २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता, एसआय मनोज सोनी, एएसआय शिवपूजन सिंग, कॉन्स्टेबल पंकज वाघ, कॉन्स्टेबल विनोद जेठवे आणि मनोज मौर्य यांच्या पथकाने या संशयितावर पाळत ठेवून त्याच्या एका साथीदारासह त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, आरोपींकडून एकूण पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यांनी जळगाव शहर बसस्थानकातून तीन मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख इमरान शेख गुफरान (वय २२, रा. मालेगाव) आणि शेख अश्फाक शेख मुस्ताक (वय ३०) यांचा समावेश आहे. शेख इमरान याला जळगाव शहर पोलिसांकडे, तर शेख अश्फाक याला जीआरपी भुसावळ यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले आहे.