लोकतंत्र सेनानी संघाच्या मेळाव्यात ३२४ सेनानींचा सहभाग !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दादर येथील वसंतस्मृती सभागृहात आयोजित लोकतंत्र सेनानी संघाच्या प्रांतस्तरीय मेळाव्यात राज्यातील एकूण ३२४ सेनानींनी सहभाग घेतला. देशात आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

या प्रांत मेळाव्याला अखिल भारतीय सचिव कोमल छेडा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत संघटनेचे प्रांत अध्यक्ष उमेकर, कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी, आणि सचिव प्रदीप ओगले हे व्यासपीठावर उपस्थित होते. कोमल छेडा, उमेकर आणि रघुनाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनपर भाषणांनंतर, महासचिव विश्वासराव कुलकर्णी यांनी संघटनेच्या कार्याचा विस्तृत आढावा सादर केला. त्यांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांचे समाधान केले.

या मेळाव्यात विश्वास कुलकर्णी यांनी एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला. निधीमध्ये दुप्पट वाढ केल्याबद्दल आणि जिल्हास्तरावर मिसाबंदी झालेल्या सेनानींच्या सत्काराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. हा ठराव उपस्थितांनी एकमताने मंजूर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप ओगले यांनी केले, तर आभारप्रदर्शन विश्वास कुलकर्णी यांनी केले. सामूहिक वंदेमातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली.