यावलमध्ये कंटेनरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू !


यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील बुरुज चौकाजवळ शुक्रवारी (२७ जून) एका कंटेनरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या एका ५८ वर्षीय महिलेचा जळगाव येथे उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील आठवडे बाजारातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर या राज्य महामार्गावर यावलमध्ये दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात रस्त्याच्या कडेला दुकाने आणि हातगाड्या लागल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे नेहमीच कोंडी होते. काल सायंकाळी याच बुरुज चौकात चुंचाळे येथील रहिवासी कस्तुरबा चैत्राम सावकारे (वय ५८) या बाजारात जात असताना, आर.जे. ०९ जी. डी. ४९७० या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालक आबिद खान नवाब याने त्यांना धडक दिली. या अपघातात कंटेनर थेट महिलेच्या डाव्या पायावरून गेल्याने त्यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवडे बाजाराच्या मर्यादेबाहेर आलेल्या अतिक्रमणामुळे एका निरपराध वयोवृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पोलिसांनी या महामार्गावरील अतिक्रमणांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या कस्तुरबा सावकारे यांच्यावर त्यांच्या मूळगावी चुंचाळे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.