Home धर्म-समाज रक्षाबंधनासाठी पोस्ट ऑफिस सज्ज ; परदेशातील भावापर्यंत पोहोचणार बहिणीची राखी, १३७ देशांत...

रक्षाबंधनासाठी पोस्ट ऑफिस सज्ज ; परदेशातील भावापर्यंत पोहोचणार बहिणीची राखी, १३७ देशांत विशेष सुविधा

0
11

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी भारतीय डाक विभाग सज्ज झाला आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे परदेशात अथवा दूरवर असलेल्या भावापर्यंत बहिणीची राखी सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी भुसावळ विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अंतर कितीही असले तरी बहिणीचे प्रेम भावाच्या मनगटापर्यंत पोहोचणार आहे.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र, जिव्हाळ्याच्या आणि भावनिक नात्याचा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना करते. त्याबदल्यात भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे आश्वासन देतो. मात्र अनेकदा शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांमुळे भाऊ दुसऱ्या शहरात किंवा परदेशात असल्याने प्रत्यक्ष रक्षाबंधन साजरे करणे शक्य होत नाही.

अशा परिस्थितीत भारतीय डाक विभागाने या भावनिक अंतरावर प्रेमाचा सेतू उभारला आहे. बहिणीने प्रेमाने निवडलेली राखी सुरक्षितपणे भावापर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भुसावळ विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पीड पोस्टच्या माध्यमातून देशांतर्गत ५० ग्रॅमपर्यंतचे राखीचे पाकीट केवळ ५५ रुपयांत पाठविता येणार आहे. परदेशात राखी पाठविण्यासाठी २३६ रुपयांपासून सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे जगातील तब्बल १३७ देशांमध्ये साधारणतः ७ ते १२ दिवसांच्या कालावधीत राखी पोहोचविण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

राखी सुरक्षित राहावी आणि प्रवासादरम्यान तिचे नुकसान होऊ नये, यासाठी आतून प्लास्टिक कोटिंग असलेले खास रक्षाबंधन पाकीटही पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे बहिणींना राखी आकर्षक पद्धतीने पॅक करून ती देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा परदेशातही पाठविता येणार आहे.

यंदाचे रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले असून, भावाच्या मनगटावर स्वतःच्या हाताने राखी बांधण्याची प्रत्येक बहिणीला इच्छा असते. मात्र भाऊ हजारो किलोमीटर दूर असल्यास प्रत्यक्ष भेट शक्य होत नाही. अशावेळी बहिणीने प्रेमाने बांधलेली राखी पोस्टाच्या माध्यमातून भावापर्यंत पोहोचणे ही नात्यातील जिव्हाळा कायम ठेवणारी भावनिक बाब ठरते.

डाक विभागाची भूमिका केवळ पत्रे किंवा पार्सल पोहोचविण्यापुरती मर्यादित नसून, माणसामाणसांमधील भावना, आपुलकी आणि नाती जोडण्याचे कामही पोस्टाच्या माध्यमातून होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. त्यामुळे देश-विदेशात असलेल्या भावांना राखी पाठवू इच्छिणाऱ्या भगिनींनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू देण्याचीही परंपरा आहे. मिठाई, विविध वस्तू किंवा रोख रक्कम देण्याऐवजी डिजिटल युगात बहिणीच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल अशी भेट देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जीवन विमा किंवा पीपीएफ खाते उघडून देणे ही बहिणीसाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त आणि दीर्घकालीन भेट ठरू शकते. राखी देशात किंवा परदेशात पाठविण्यासाठी उपलब्ध सुविधा, दर, पाकीट आणि इतर आवश्यक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक मनीष नवलु यांनी केले आहे.


Protected Content

Play sound