नशिराबाद येथील शाळेच्या प्रवेशाने 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचले !


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १०वी उत्तीर्ण झालेल्या ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्याने त्यांचे भवितव्य अंधारात सापडले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्पर कारवाईमुळे या विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक दाखले देण्यास सातत्याने टाळाटाळ करत होते, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत होते.

या गंभीर परिस्थितीची माहिती एका सामाजिक संघटनेमार्फत सीईओ मिनल करनवाल यांना मिळाली. त्यांनी तात्काळ यावर लक्ष केंद्रित केले आणि गटशिक्षण अधिकारी सरला पाटील, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण व खलील पठाण यांच्या पथकाला शाळेत जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले.

मात्र, शाळेच्या माजी प्रभारी मुख्याध्यापकाने प्रशासनाच्या पथकाला शाळेत प्रवेश नाकारत प्रवेशद्वाराला कुलूप लावले. या अडथळ्यानंतर करनवाल यांनी स्वतः पुढाकार घेत पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून पोलीस संरक्षणाची मागणी केली. जिल्हा पोलीस प्रशासनानेही त्वरित प्रतिसाद देत, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित माजी प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा आणि शकील शेख मुसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शनिवार, २८ जून रोजी पोलीस संरक्षणात माध्यमिक शिक्षण विभागाचे पथक पुन्हा शाळेत पोहोचले. कार्यालयाला कुलूप असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी सरला पाटील यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार एकतर्फी स्वीकारला. त्यांनी त्वरित विद्यार्थ्यांना उपलब्ध दप्तरी माहितीच्या आधारे शाळा सोडल्याचे दाखले तयार करून वाटप केले.

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कायद्याच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क सुनिश्चित करण्यासाठी घेतलेली ठोस भूमिका कौतुकास्पद आहे. ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवून, जिल्हा परिषद प्रशासनाने समाजात एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे.