जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात आज पहाटे रस्त्यावर मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत अर्भक आढळल्याने ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आंबेडकरनगरातील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील एका गल्लीतील रस्त्यावर नागरिकांना अर्भक आढळून आले. नागरिकांनी तातडीने याबाबत शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे आणि नमुने तपासण्याची प्रक्रिया केली. अर्भक नेमके कधी आणि कोणाकडून येथे आणण्यात आले, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी परिसरात अंधाराचा फायदा घेत अज्ञात महिलेने मृत अर्भक येथे फेकून दिले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. परिसरातील संभाव्य सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिस तपासाची दिशा निश्चित करीत आहेत.

या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ते येथे कशा परिस्थितीत आणण्यात आले आणि या घटनेमागे नेमके कोण आहे, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे. घटनेमुळे आंबेडकरनगर परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तपासाला सुरुवात केली असून, या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.



