Home Cities जळगाव अजिंठा चौफुली भंगार बाजार प्रकरणी गाळेधारकांची मनपाच्या नोटिशीला कायदेशीर हरकत

अजिंठा चौफुली भंगार बाजार प्रकरणी गाळेधारकांची मनपाच्या नोटिशीला कायदेशीर हरकत

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील भंगार बाजाराच्या प्रश्नावर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगाव शहर महानगरपालिकेने १६ ऑक्टोबर रोजी बॅनरद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटिशीला भंगार बाजारातील गाळेधारक आणि एकता संघटनेच्या वतीने कायदेशीर हरकत घेण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर मनपाचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची ग्वाही दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

एकता संघटनेचे फारुक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या मालमत्ता व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पंकज गोसावी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अजिंठा चौफुली येथील भंगार बाजाराबाबत मनपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटिशीच्या पार्श्वभूमीवर गाळेधारकांची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. भंगार बाजारासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कोणतीही घाईची किंवा बळजबरीची कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे आणि न्यायालयीन प्रक्रियेला बाधा येईल, अशी कोणतीही कृती करू नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी उपायुक्त पंकज गोसावी यांनी शिष्टमंडळाला उच्च न्यायालयाच्या आदेशाव्यतिरिक्त महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या आश्वासनामुळे भंगार बाजारातील गाळेधारकांना तूर्तास दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाने संपूर्ण कार्यवाही कायद्याच्या चौकटीत राहून करावी, गाळेधारकांच्या नैसर्गिक न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण करावे आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखूनच या प्रश्नावर पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी भंगार बाजारातील गाळेधारकांच्या वतीने फिरोज अब्बास, अय्युब मुलतानी, फिरोज मुलतानी, शाकिर खान मुलतानी, खान मुलतानी, जाकीर बागवान, मुनीर सय्यद आणि अल्लाबक्ष बागवान उपस्थित होते. तसेच एकता संघटनेचे आरिफ देशमुख, अनिस शहा, मतीन पटेल, अॅड. जफर मिर्झा, असलम पिंजारी आणि एरंडोल येथील रहीम शेख यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound