Home धर्म-समाज संत मुक्ताई पालखी सोहळ्यापूर्वी मुक्ताईनगरात स्वच्छता व सुविधा द्या ; वारकरी-नागरिकांची मागणी

संत मुक्ताई पालखी सोहळ्यापूर्वी मुक्ताईनगरात स्वच्छता व सुविधा द्या ; वारकरी-नागरिकांची मागणी

0
16

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येत्या १८ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर शहरात आदिशक्ती संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची स्वच्छता, वारकरी व भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच धार्मिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी मांस-मटण व मच्छी विक्रीची दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत लक्ष्मण रमेश सापधरे यांनी समस्त वारकरी व मुक्ताईनगर नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील दिंडी मार्गाची तातडीने पाहणी करून ठिकठिकाणी साचलेला कचरा व अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पालखी मार्गावर रस्त्यावरील खडी, रेती तसेच वाहतुकीस किंवा दिंडीच्या मार्गक्रमणास अडथळा ठरणाऱ्या इतर वस्तू हटविण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक मुक्ताईनगरात दाखल होणार असल्याने त्यांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी पालखी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरती शौचालये उपलब्ध करून द्यावीत, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, पालखी सोहळ्याचे धार्मिक व पवित्र वातावरण अबाधित राहावे, यासाठी १८ ऑगस्ट रोजी शहरातील मांस-मटण व मच्छी विक्रीची दुकाने तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत नगरपंचायतीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालखी सोहळा सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन, नगरपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पालखी आगमनापूर्वीच सर्व आवश्यक कामे पूर्ण करून वारकरी व भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा मुक्ताईनगरातील नागरिक व वारकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound