मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कर्की सीमा तपासणी नाका चुकवून चोरट्या मार्गाने सुरू असलेली ओव्हरलोड वाहनांची वाहतूक रोखावी आणि शासनाचे होणारे महसुली नुकसान थांबवावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि. १७) कर्की सीमा तपासणी नाक्यावर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान संबंधित अवैध वाहतूक करणाऱ्या मार्गावर पोलीस व परिवहन विभागाची कायमस्वरूपी संयुक्त चौकी स्थापन करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली.
कर्की सीमा तपासणी नाक्यावरून होणारी ओव्हरलोड वाहनांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी चौकशीसंदर्भात पत्र दिले होते. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र संबंधित विभागाला सुपूर्द करण्यात आले. मात्र, या गंभीर प्रश्नावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर १७ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. कर्की फाटा, नायगाव फाटा, नायगाव गावाबाहेरील घंटा मारोती मंदिरासमोरून पुरणाड गावामार्गे पुरणाड फाट्याकडे जाणाऱ्या अंतर्गत मार्गाचा वापर करून अनेक वाहने तपासणी नाका हुलकावणी देऊन जात असल्याचा संतापजनक प्रकार आंदोलकातर्फे निदर्शनास आणून देण्यात आला.
अशा प्रकारे विनापरवाना व ओव्हरलोड वाहने या मार्गावरून जात असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अवैध प्रकाराला तातडीने आळा घालण्यासाठी संबंधित मार्गावर २४ तास कार्यरत राहील अशी पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त तपासणी चौकी त्वरित उभारावी. तसेच ओव्हरलोड वाहनांची कसून चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.
आंदोलनाची तीव्रता पाहता परिवहन विभागाकडून याबाबतचे लेखी पत्र प्राप्त झाल्याची माहिती शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी दिली. कायमस्वरूपी संयुक्त चौकी उभारण्याच्या मुद्यावर योग्य तो अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महसुलाचे नुकसान थांबवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, नगरसेवक गणेश टोंगे, माजी नगरसेवक निलेश शिरसाठ, मोहन बेलदार, राजेंद्र वानखेडे, पंकज कोळी, दीपक वाघ, प्रफुल्ल पाटील, आप्पा वंजारी, रणजीत गोयंका, विनोद पाटील आणि नारायण पाटील यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



