रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वतंत्र व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी रावेर शहर काँग्रेसतर्फे आज आक्रमक आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ नुसार पारदर्शक निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी रावेर शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरू झालेली ही पदयात्रा थेट रावेर तहसील कार्यालयावर धडकली, जिथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संजय तायडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला. देशात लोकशाहीचा संकोच होत असून निवडणुकीतील पारदर्शकता धोक्यात आल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ मधील तरतुदींनुसार देशात निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पडणे आवश्यक असताना सध्याची निवडणूक यंत्रणा संशयास्पद पद्धतीने काम करत असल्याचा थेट आरोप आंदोलकांनी निवेदनाद्वारे केला आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, शहराध्यक्ष धुमा तायडे आणि तालुकाध्यक्ष यशवंत महाजन सर यांच्या मुख्य उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सावंत मेढे, सुनील कोंडे, इम्रान शेख, ॲड. योगेश गजरे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून जात तहसील कार्यालयात पोहोचली.
रावेर शहर काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आणि भाजपविरोधात जोरदार निदर्शने करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.



