पारोळ्याच्या ‘आरोग्यदूत’ ईश्वर ठाकूर यांचा स्वर्गरथ समितीतर्फे गौरव


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळख निर्माण केलेले ईश्वर बाबा ठाकूर यांचा गौरव नुकताच शहरातील स्वर्गरथ देणगीदार व संचालन समितीच्या वतीने करण्यात आला. विविध आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिकेद्वारे अनेकांचे प्राण वाचवणारे आणि मृतदेह त्यांच्या गावी पोहचवणारे ईश्वर ठाकूर यांचे योगदान अविस्मरणीय असून, त्यांच्या सामाजिक सेवेला सन्मान देण्यासाठी हा सत्कार सोहळा पार पडला.

ईश्वर ठाकूर यांचा काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील स्वर्गरथ संचालन समितीनेही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. योगेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ईश्वर बाबा यांच्यामुळे पारोळ्यातील अनेक नागरिकांचे प्राण संकटातून वाचले आहेत. रुग्णवाहिकेद्वारे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळवून दिल्यामुळे अनेकांना नवजीवन मिळाले आहे.

डॉ. पवार यांनी नमूद केले की, गेल्या सात महिन्यांपासून ईश्वर ठाकूर हे शहरातील एकमेव ‘स्वर्गरथ’ सेवा स्वतःच्या हद्दीत चालवतात. मृतदेहांचे अंत्यसंस्कारासाठी वाहतूक करण्याचे कार्य ते अत्यंत जबाबदारीने आणि नि:स्वार्थपणे करत आहेत. अशा सेवाभावी व्यक्तीचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात उपस्थित जनसेवक पी. जी. पाटील यांनी सांगितले की, ईश्वर बाबा ठाकूर यांनी फक्त पारोळ्यातच नव्हे तर देशाच्या इतर भागांमध्येही अनेक मृतदेह वेळेवर नियोजित स्थळी पोहोचवले आहेत. मध्यरात्री असो वा पूरस्थिती – एका हाकेवर ते तत्परतेने धावून येतात. त्यांच्या समर्पित सेवेमुळे नागरिकांचा त्यांच्यावर अपार विश्वास आहे.

या सत्कार सोहळ्यावेळी स्वर्गरथ संचालन समितीचे सदस्य डॉ. योगेंद्र पवार, समाजसेवक पी. जी. पाटील, अशोककुमार लालवाणी, समाधान धनगर, विकास चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समितीच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन ईश्वर ठाकूर यांचा गौरव करण्यात आला.सामाजिक सेवेसाठी कायम सज्ज असलेले ईश्वर बाबा ठाकूर हे खऱ्या अर्थाने समाजासाठी ‘जीवदान’ देणारे आरोग्यदूत आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेला मिळालेला सन्मान हा संपूर्ण पारोळा शहरासाठी अभिमानास्पद क्षण होता.