राजुरा ग्रामपंचायतीत सरपंचांचा निधी घोटाळा; लाखो रुपयांचा अपहार


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच व प्रभारी सरपंच राहुल अप्पा रोटे यांनी एकाच जागेवर आपल्या कुटुंबातील तिन सदस्यांच्या नावावर घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गाय-गोठा योजनेचा गैरफायदा घेऊन शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचेही समोर आले आहे. तक्रारीनंतर चौकशी आदेश देण्यात आले असून संबंधितांकडून शासनाच्या निधीची परतफेड व कायदेशीर कारवाईचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

प्रभारी सरपंच राहुल रोटे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२६/८ या उताऱ्यावर स्वतः, भाऊ, पत्नी आणि इतर कुटुंबीयांच्या नावावर लाभ घेतला असून संबंधित जागा एकच असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ही जागा त्यांच्या वडिलांच्या नावे असून, तरीही विविध नावांनी योजना मंजूर करून रक्कम उचलण्यात आली आहे. याशिवाय, शासनाच्या गाय-गोठा योजनेअंतर्गतही योजना मंजूर करून निधीचा अपहार करण्यात आला. हे सर्व ग्रामसेवक व रोजगार सेवकांच्या संगनमताने केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पंकज रामधन रोटे यांनी या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान ग्रामसेवकांनी अहवालात नमूद केले की, सदर जागेवर घरकुलांचे बांधकाम अपूर्ण असून कोणताही गोठा अस्तित्वात नाही. यामुळे तक्रारदाराच्या आरोपांना पुष्टी मिळाली.

दिनांक १८ जून २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार संबंधित लाभार्थ्यांनी १० दिवसांत संपूर्ण रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश गटविकास अधिकारी (नरेगा), जि.प. जळगाव यांनी दिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात एकूण अंदाजे ४ लाख २० हजार रुपयांच्या निधी अपहाराचा ठपका आहे. राहुल रोटे यांनी ११ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व प्रभारी सरपंच म्हणून कामकाज करत असताना आपल्या पत्नी सौ. कल्पना रोटे, वडील रामधन रोटे, भावजय सौ. वैशाली रोटे, भाऊ गौतम रोटे आणि भावजय सौ. दिपाली रोटे यांच्या नावावर योजनांचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

याआधी २०२०-२१ मध्ये कुर्‍हा-वडोदा परिसरातही अशाच प्रकारे सुमारे ४०० ते ५०० गाय गोठे ऑनलाईन करून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्यात आला होता व त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे राजुरा येथील प्रकाराकडेही शासन किती गांभीर्याने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजुरा ग्रामपंचायतीतील या गंभीर अपहार प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, शासनाच्या योजनांचा असा अपवापर थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.