जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, विशेषतः दर्शनबारीतील भाविकांना मोफत अन्नदान उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव येथून ‘जळगाव मोफत अन्नदान सेवा संस्थे’च्या वतीने अन्नधान्याने भरलेले एक वाहन जुने जळगाव येथून शनिवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले. यात तेल, रवा, गहू, तांदूळ, साबुदाणा यांसारख्या आवश्यक अन्नधान्याचा समावेश आहे.
‘जळगाव मोफत अन्नदान सेवा संस्थे’चे हे सलग पंधरावे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेने पंढरपूरच्या भाविकांसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते भगवा झेंडा दाखवून या अन्नधान्य वाहनाला पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूरमध्ये दर्शनासाठी मोठ्या रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना, विशेषतः वारकऱ्यांना वेळेवर भोजन मिळावे यासाठी या संस्थेचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ‘जळगाव मोफत अन्नदान सेवा संस्था’ गेली पंधरा वर्षांपासून निस्वार्थपणे हे कार्य करत असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. ललित वसंत काळे असून, उपाध्यक्ष श्री. नरेंद्र (नाना) गोपाळ काळे यांचा देखील उपक्रमात सक्रिय सहभाग आहे. सचिव श्री. डिंगबर सुभाष कोल्हे यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली असून, सर्व विश्वस्त आणि सभासदांनी संघटितपणे हे कार्य उभारले आहे.
विश्वस्त श्री.विजय जगन्नाथ चौधरी, श्री.हेमंत देवराम नेमाडे, श्री.उमाकांतअरविंद पाटील यांच्यासह सभासद श्री.सुभाष लक्ष्मण कोल्हे, श्री.विनोद सुभाष कोल्हे, श्री.सुरेश गणपत निकम,आणि श्री.अनिल गणपत पाटील यांचा मोलाचा सहभाग उपक्रमाला लाभला आहे. एकात्मतेने व सेवाभावाने कार्य करत संस्थेच्या सदस्यांनी भाविकांसाठी भोजन व्यवस्था उभारली आहे.