पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फास्टॅग असतानाही टोलचा बूम बोनेटवर पडल्याच्या किरकोळ वादातून सबगव्हाण टोल नाक्यावरील १० ते १२ कर्मचाऱ्यांनी एका महिलेसह तिच्या कुटुंबावर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी बादलीने निदयीपणे प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी १२ एप्रिल रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात ५ जणांसह इतर अनोळखी ५-६ कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या महिला ह्या आपल्या दोन मुलांसह दिराणी व पुतण्या यांच्यासोबत रविवारी १२ एप्रिल रोजी जळगाव येथून धुळे येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कार क्रमांक (एमएच १९ ईपी ८५३०) ने निघाले होते. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास पारोळा ते सबगव्हाण दरम्यानच्या टोलनाक्यावर पोहचले. फास्टॅगमुळे टोल आपोआप कट झाला असेल या समजातून महिलेचा मुलगा यांनी गाडी पुढे नेऊ केले. परंतू त्याच वेळी टोलचा बूम अचानक कारच्या बोनेटवर पडला.

याबाबत विचारणा करण्यासाठी महिलेचा पुतण्या हा गाडीखाली उतरला असता, टोल कॅबिनमधील कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वाद मिटवण्यासाठी पिडीत महिलेसह त्यांची कारमधील सर्वांनी धाव घेवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने येथे टोल नाक्यावरील व्यवस्थापक शरद पुंडलिक चौधरी रा. मुकटी ता.धुळे, समाधान दयाराम सरदार रा. सावखेडा, गोरख रोहिदास पाटील रा. मुकटी ता. धुळे, निलेश आनंदराव खेमनाथ रा. गोकुळ नगर, धुळे, आणि तुकाराम किसन गवळी रा. दळवेल ता. पारोळा यांच्यासह या टोलनाक्यावर काम करणारे इतर ५ ते ६ कर्मचारी यांनी दोन्ही महिलांना अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीमध्ये दोन्ही महिलांना त्यांच्या पायावर व कमरेवर वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नाही तर दोन्ही महिलांचा विनयभंग केला आहे. सर्व प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिवाय आईच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तर काकूच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची पोत गहाळ किंवा चोरून नेले आहे.
पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ल नाक्यावरील व्यवस्थापक शरद पुंडलिक चौधरी रा. मुकटी ता.धुळे, समाधान दयाराम सरदार रा. सावखेडा, गोरख रोहिदास पाटील रा. मुकटी ता. धुळे, निलेश आनंदराव खेमनाथ रा. गोकुळ नगर, धुळे, आणि तुकाराम किसन गवळी रा. दळवेल ता. पारोळा यांच्यासह या टोलनाक्यावर काम करणारे इतर ५ ते ६ कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



