Home धर्म-समाज मुक्ताईनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात 

मुक्ताईनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. संविधान जागरूकता, सामाजिक मूल्ये आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. रोहिणीताई खेवलकर होत्या, तर मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी सर आणि उपमुख्याध्यापिका श्रीमती शिर्के मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी चेअरमन रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “संविधान वाचन ही काळाची गरज आहे” असे प्रतिपादन केले.

यानंतर उपशिक्षक संजय ठाकूर यांनी संविधान वाचन घेतले, तसेच सर्व शिक्षकांनी संविधान पत्रिकेचे सामूहिक वाचन केले. शाळेच्या सभागृहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक तास सामूहिक वाचन घेण्यात आले, ज्यामुळे संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमात कलाशिक्षिका अर्चना भोळे यांनी साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. उपस्थितांनी या उत्कृष्ट कलाकृतीचे कौतुक करत कलाकाराचे अभिनंदन केले. या कलाकृतीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली.

त्यानंतर शाळेतून प्रवर्तन चौकापर्यंत विद्यार्थ्यांची भव्य पायी रॅली काढण्यात आली. घोषणाबाजी करत काढलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रवर्तन चौकात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी कलाशिक्षक मनोज सुरवाडे तसेच अक्षय सौंदळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वेश परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. बी. परदेशी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम. के. पाटील, धीरज खडसे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


Protected Content

Play sound