पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र भूमिका घेत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने अखेर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत १४ एप्रिल रोजी पाचोरा पोलिस स्टेशनसमोर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कैलास तांबे, चंदू खरे, निलेश पाटील आणि कुंदन बेलदार यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत सट्टा मटका, पत्यांचे क्लब, विमल गुटखा विक्री तसेच विनापरवाना देशी, विदेशी आणि गावठी दारू विक्री असे विविध अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या अवैध धंद्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असून, युवकांमध्ये चुकीच्या प्रवृत्ती वाढत असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि पत्रकारांची बदनामी करणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, हीदेखील आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळेच उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. संबंधित अवैध धंदे पूर्णपणे बंद होईपर्यंत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
दरम्यान, या उपोषणाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. नागरिकांमध्येही या आंदोलनाबाबत चर्चा सुरू असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी पुढे येत आहे.



