अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन


मुंबई- वृत्तसेवा । बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता, तिला मृतावस्थेत मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (अंधेरी) येथे आणण्यात आलं होतं. शेफाली ४२ वर्षांची होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”शेफाली जरीवाला हिचा मृतदेह अंधेरी परिसरात असलेल्या तिच्या घरी सापडला होता. याबाबत रात्री एकच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयामध्ये पाठवला आहे. तसेच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही’’.

शेफालीला ‘कांटा लगा’ या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग व शेफालीने ‘नच बलिए’ या डान्स रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. तसेच शेफालीने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात खास भूमिका केली होती.