पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळाली असून, शहरासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिकची विविध विकासकामे मंजूर झाल्याची माहिती आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत साकारण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाचेही दिमाखात लोकार्पण करण्यात आले.
माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतून आणि आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून पारोळा शहराच्या विकासासाठी विविध पायाभूत सुविधांना चालना देण्यात आली आहे. शहरातील रस्ते, प्रकाशव्यवस्था, पाणीपुरवठा, भुयारी गटार, उद्याने, चौकांचे सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास तसेच महापुरुषांच्या स्मारकांसह विविध कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील एलईडी स्ट्रीट लाईट व हायमास्ट दिव्यांसाठी ४ कोटी रुपये, अमळनेर रोड काँक्रीटीकरणासाठी २ कोटी ४० लाख रुपये, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये, धुळे रोडलगतच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी ४१ लाख रुपये, तर धरणगाव रोडलगतच्या स्मशानभूमीसाठी १ कोटी २५ लाख रुपयांची कामे करण्यात येत आहेत. याशिवाय शहरातील गार्डन, उद्याने, महामार्ग व खुल्या जागांवर वृक्षारोपण, विद्युतीकरण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाचाही समावेश आहे.

पारोळा शहरातील धरणगाव रोड आणि धुळे रोडलगतच्या स्मशानभूमींचे सुशोभीकरण ही नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत दोन्ही ठिकाणी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सार्वजनिक सुविधांच्या विकासाला मिळालेल्या या गतीचे स्वागत होत आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाचे लोकार्पण. पारोळा शहरात अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मातंग समाज बांधवांसह शहरवासीयांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीला मूर्त स्वरूप मिळाल्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात आले. स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देश आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक अभिमान, उत्साह आणि एकात्मतेचे विशेष स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी आमदार ॲड. अमोल पाटील यांनी पारोळा शहराच्या विकासाबाबत बोलताना, “ही केवळ विकासकामे नाहीत, तर पारोळ्याच्या भवितव्याची पायाभरणी आहे,” असे सांगितले. माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून शहरासाठी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध झाला असून, त्यांच्या प्रयत्नांना पुढे नेत शहराच्या विकासाची दूरदृष्टीपूर्ण संकल्पना घेऊन काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारोळा शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार प्रकल्प, चौकांचे सुशोभीकरण, उद्याने, विद्युतीकरण, स्मशानभूमी विकास, महापुरुषांचे पुतळे व स्मारके, व्यापारी संकुले, बाजारपेठ विकास आणि विविध पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटी रुपयांहून अधिकची विकासकामे मंजूर झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
नागरिकांना चांगले रस्ते, सक्षम वीज व्यवस्था, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा, भुयारी गटार व्यवस्था, आकर्षक सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छ व सुंदर स्मशानभूमी आणि विकसित उद्याने उपलब्ध करून देणे हा विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले. पारोळा शहर अधिक सुंदर, स्वच्छ, सुरक्षित, सुटसुटीत आणि आधुनिक करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील विकासकामांचा वेग यापुढेही कायम ठेवून पारोळ्याच्या प्रत्येक भागात विकास पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. या विकासप्रवासात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंदआबा शिरोळे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल पवार, उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, गटनेते तथा नगरसेवक अमृत चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, मुख्याधिकारी तुषारजी नेरकर, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगरसेवक पंकज मराठे, नितीनभाऊ सोनार, डॉ. मंगेश तांबे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, विविध समित्यांचे सभापती, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, स्मारक समितीचे पदाधिकारी, मातंग समाज बांधव आणि शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.



