Home Cities पारोळा पारोळ्यात ‘महसूल समाधान शिबिर’; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आमदार अमोल पाटील यांच्या...

पारोळ्यात ‘महसूल समाधान शिबिर’; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आमदार अमोल पाटील यांच्या सूचना

0
82


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने पारोळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, तर शासकीय सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका आमदार पाटील यांनी यावेळी मांडली.

महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा, शासकीय योजना, दाखले, जमिनीच्या नोंदी, फेरफार तसेच प्रलंबित प्रकरणांबाबत नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाहीची सुविधा या शिबिरातून उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्यास तसेच संबंधित विभागाकडून त्यावर मार्गदर्शन मिळण्यास मदत झाली. यावेळी बोलताना आमदार ॲड. अमोल पाटील म्हणाले की, महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला महत्त्वाचा विभाग आहे. नागरिकांना एखाद्या कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये. त्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी ऐकून घेऊन त्यावर वेळेत आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम केल्यास नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.

शासकीय योजना आणि निर्णय केवळ कागदावर न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा प्रत्यक्ष लाभ पोहोचला पाहिजे, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या महसूलविषयक अडचणी, प्रलंबित प्रकरणे आणि आवश्यक सेवांबाबत थेट मार्गदर्शन मिळत असल्याने नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिबिरात प्राप्त झालेल्या अर्ज व तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महसूल प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करून पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी कारभाराला चालना देणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जगदीशदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीष पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, जि.प. माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, एरंडोल तहसीलदार गोपाल पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार देवरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, एरंडोल नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound