पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील करमाड खुर्द येथील सरपंचांना न्यायालयाने दिलासा देऊनही त्यांचे सरपंचपद अबाधीत असल्याचा आदेश देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेवटी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना उपोषण करावे लागले.
याबाबत माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथील सरपंच बंडू भिल यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. या विरोधात भिल यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांचे सरपंच पद कायम ठेवण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु हा निकाल प्राप्त होऊनही गटविकास अधिकारी त्याबाबतचे आदेश भिल यांना आदेशाचे पत्र देण्यास टाळाटाळ करत होते.
दरम्यान, याबाबतचे आदेश मिळावेत म्हणून माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी सरपंच भिल यांच्यासह पंचायत समितीच्या आवारात काल उपोषण केले. गटविकास अधिकारी विकास लोंढे हे सरपंच बंडू भिल यांना सरपंच पद कायम असल्याच्या आदेशाची प्रत देत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका, माजी मंत्री डॉ. पाटील यांनी घेतल्याने पंचायत समितीच्या परिसरात खळबळ उडाली.
शेवटी गटविकास अधिकारी लोंढे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याशी चर्चा करून, आदेशाचे पत्र देत उपोषण सोडवले. या प्रकरणाची आपण ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा डॉ. सतीश पाटील यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, माजी संचालक पंडित पाटील, मनोराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.