बीएचआरचे बँक खाते सील : कर्मचार्‍यांचा पीएफ थकीत असल्याने कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्मचार्‍यांचा तब्बल ६ कोटी ५० लाख रूपयांचा भविष्य निर्वाह निधी थकीत असल्याच्या कारणावरून बीएचआर पतसंस्थेचे चार बँक खाते सील करण्याचे आदेश पीएफच्या विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेने कर्मचार्‍यांना पीएफचे ६ कोटी ५० लाख रुपये न दिल्याने नाशिकच्या भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिले आहेत बीएचआर पतसंस्थेत कार्यरत असलेल्या दोन हजार कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या १३ कोटी रुपयांची थकबाकी असून याबाबत पीएफ कमिशनर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. याबाबत कार्यवाहीचे आदेश देतांना आयुक्तांनी बीएचआरचे चार बँक खाते सील करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.

बीएचआर पतसंस्था अवसायनात आहे. अवसायकांकडून बीएचआरची कर्जवसुली करून ठेवीदारांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. वसूल झालेली रक्कम जप्त झाल्यास ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यास विलंब लागणार आहे. कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे पैसे बीएचआर या पतसंस्थेने वेळोवेळी भरलेले नाहीत. त्यामुळे या पतसंस्थेच्या जप्तीचे आदेश निघाले आहेत. दरम्यान, याच संदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बीएचआरतर्फे रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर आज सुनावणी होणार असल्याचे अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी सांगितले.

Protected Content