पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुवर्ण महोत्सव साजरी करणाऱ्या महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे एक स्तुत्य उपक्रम पार पडला. पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून या शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समाजातील जाणिवशील व्यक्तींनी पुढाकार घेतल्याचा हा प्रेरणादायी प्रसंग ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. आढावे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी पापाशेठ वाघरे, संजय पचेरवार, सुजीत वाघरे, पत्रकार अविनाश बाविस्कर, सुरज वाघरे, रवी करोसिया, चेतन वाघरे, प्रल्हाद पचेरवार, सारंग वाघरे आणि सोनु लिडीया यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना १० डझन वह्या, २० चित्रकला वही, २० रंगपेटी, २० कंपास पेटी आणि २० पेन यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी सुरज वाघरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. व्ही. आढावे यांनी पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी ही मदत प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी तर आभारप्रदर्शन एच. डी. माळी यांनी केले.