धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा, सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय व काकासाहेब दामोदर कुडे बालकमंदिरच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत, विठ्ठल नामाच्या गजरात शहरात मिरवणूक काढली. या सोहळ्याने संपूर्ण नगरी भक्तिमय झाली.
दिंडी सोहळ्याची सुरुवात संस्थेचे संचालक मनोहर बडगुजर यांच्या हस्ते विठ्ठल माऊलीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. रमेश महाजन, संस्थेचे अध्यक्ष मा. हेमलालशेठ भाटिया, सचिव ललित उपासनी, उपाध्याय चिंतामण पाटील, मुख्याध्यापक जीवन पाटील व एस. एस. पाटील, बालक मंदिरच्या प्रमुख मीनाक्षी वारुळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ज्ञानोबा-तुकोबा’ आणि ‘विठू माऊली’च्या जयघोषात शहरातील रस्ते भक्तिमय वातावरणाने न्हाल्याचे दृश्य होते. चिमुकल्यांनी परिधान केलेल्या वारकरी वेषभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी त्यांच्या गजराचे, श्रद्धेचे आणि भक्तिभावाचे भरभरून कौतुक केले. विशेषतः बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरागस भावाने सर्वांची मने जिंकली.
या वारकरी मुलांना एकविरा हॉटेलचे मालक मोहनभाऊ पाटील यांनी प्रेमपूर्वक नाश्ता व शिदोरी दिली. दिंडीच्या आयोजनात माऊली वारकरी संस्था, श्री संत कृपा वारकरी संस्था व ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था यांनी मोलाचे सहकार्य केले. ह. भ. प. भगवानबाबा महाराज, नाना महाराज, सुखदेव महाराज व हिरालाल महाराज यांनी या भक्ती सोहळ्यात सहभाग घेतला.
या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन ए. एच. पाटील, आर. डी. महाजन, सांस्कृतिक समिती प्रमुख वाय. पी. पाटील, दीपाली झटकार, वर्षा तडवी, वर्षा पाटील, रजनिराणी पवार, सरोज तारे, पी. पी. रोकडे, व्ही. एल. मोरे, नीता महाजन, शीतल वानखेडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालक मंदिरच्या स्टाफच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाले.