
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक पंकज रमेश बोंडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावली आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले असून, त्यांना मानाची पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रा. डॉ. पंकज रमेश बोंडे यांनी ‘एसएस (Stainless Steel) वापरून वायर कट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग (WEDM) प्रक्रियेच्या मशिनिबिलिटी ऑप्टिमायझेशनची अंमलबजावरून अंमलबजावणी’ या अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले आहे. आधुनिक उत्पादन क्षेत्र (Modern Manufacturing Sector) आणि प्रगत औद्योगिक प्रक्रियांमध्ये या संशोधनाचा अत्यंत मोठा आणि दूरगामी फायदा होणार आहे. प्रा. बोंडे यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि सातत्याने केलेल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात एक नवं आणि उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च पदवी संपादन केली आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगसारख्या तांत्रिक आणि आव्हानात्मक विषयात संशोधनाचा दर्जा उंचावत प्रा. बोंडे यांनी मिळवलेले हे यश तरुण संशोधकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, सदस्य डॉ. वैभव पाटील, सदस्य डॉ. अनिकेत पाटील आणि सदस्य डॉ. अक्षता पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. पंकज बोंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



