आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांची मनमोहक पालखी


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील युनिक इंटरनॅशनल स्कूलने आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक व भक्तिभावाने परिपूर्ण पालखी सोहळा आयोजित केला. बस स्टॅंडजवळील या शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी व वासुदेवाच्या वेशभूषेत सहभागी होत आषाढी वारीचा आनंद घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “माऊली… माऊली” च्या जयघोषात निघालेला हा पालखी सोहळा मुक्ताईनगरवासीयांचे विशेष आकर्षण ठरला.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण असलेल्या आषाढी एकादशीचे महत्त्व लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनामनात रूजावे यासाठी युनिक इंटरनॅशनल स्कूलने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले. शाळेच्या आवारातून सुरू झालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात, टाळ, मृदंग आणि भगव्या पताका घेऊन श्रद्धेने सहभाग नोंदवला. शाळेच्या रस्त्यावरून गेलेली ही पालखी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्यांचा विठ्ठल, रुक्मिणी व वासुदेवाच्या वेशातील वावर. त्यांच्या वेशभूषेतील सौंदर्य, चेहऱ्यावरील भक्ती आणि उभा राहण्यातील आत्मविश्वास यामुळे त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडलं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे परिश्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन स्पष्टपणे दिसून आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष श्री. आत्माराम मासुळे, मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे यांचे मार्गदर्शन आणि शिक्षक वृंदाचे समर्पित योगदान महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांसाठी खास वेशभूषेची तयारी, संवाद साधणाऱ्या प्रसंगांची आखणी आणि संस्कृतीचा परिचय या सर्व बाबींत शाळेने उत्कृष्ट कौशल्य दाखवले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, एकता आणि सामाजिक मूल्यांचे रोपण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर शाळेच्या आवारातच पालखी विसर्जन आणि प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान पाहून पालक व उपस्थित नागरिक भारावून गेले. शाळेच्या या उपक्रमाचे मुक्ताईनगरमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.