पंढरपूर । पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर असले तर दुसर्यात भालकेंनी आघाडी घेतल्याचा कल समोर आला आहे. यामुळे येथील लढत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक घेण्यात आली होती. यात राष्ट्रवादीने त्यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतारले. दोन्ही बाजूंनी ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भालके यांच्यासाठी प्रचार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर येथे मुक्काम ठोकला होता. तर भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील झंझावाती सभा घेतल्या. यामुळे पहिल्या टप्प्यात भालके यांना सहजसोपा वाटणारा विजय नंतर चुरशीच्या लढाईत परिवर्तीत झाला.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली. नंतर मात्र दुसर्या फेरीत भगिरथ भालके यांना १०० मतांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. ही आघाडी अल्प असल्याने येथील लढत ही चुरशीची असल्याचे मतमोजणीतूनही दिसून आले आहे.