भारतरत्न लता मंगेशकर यांना अमरावतीकरांनी वाहिली संगीतमय आदरांजली

अमरावती – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कृष्णधवलपासून ते रंगीत काळातील सुमधुर गीतांनी गाण कोकिळेच्या आठवणी जागवल्या. या सुमधुर गीताच्या माध्यमातून अमरावतीकरांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.

नुकताच हा कार्यक्रम अभियंता भवन, शेगाव नाका ,अमरावती येथे घेण्यात आला. अनंता देशपांडे आणि संगीत संयोजक सचिन गुढे हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा अर्बन परिवार आणि क्रिएटिव्ह ग्रुप अमरावतीच्या वतीने करण्यात आले.

‘रहे ना रहे हम; महका करेंगे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संगीत रत्न पुरस्कार प्राप्त डॉ. भोजराज चौधरी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भोजराज चौधरी, सुहासिनी शेट्टी, रमेशजी राठी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी सहा गायक प्रमोद ढगे,  नयना दापुरकर, राहुल वरुडकर आदींना आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात ‘रहे ना रहे हम’ या सुमधुर गीतांनी करण्यात आली.  यावेळी कार्यक्रम ‘तु जहां जहां चलेगा; मेरा साया साथ होगा’,’ एक प्यार का नगमा है; मौजो की रवानी है’, ‘दिल तो है; दिल दिल का एतबार क्या चीज है’, ‘सावन का महिना; पवन करे शोर’,  ‘कोरा कागज था यह मन मेरा’, ‘बेखुदी मे सनम; उठ गए जो कदम’, ‘सुन बेलिया; शुक्रीया मेहरबानी’, ‘हमे और जिने की चाहत ना होती’, ‘जिन्हे हम मिल गए हमदम’ आदी. एकापेक्षा एक सुरस गाण्याची बरसात या दरम्यान करण्यात आली.

या संगितमय संध्याने  अमरावतीकरांना खिळवून ठेवल्याचे चित्र दिसून आले.संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. दरम्यान या कार्यक्रमात मान्यवर कलाकारांनी एकाहून एक एक सरस गीते सादर करून रसिकांना लतादीदींच्या सुरांच्या आठवणीत नेले. या कार्यक्रमात आपल्या सादरीकरणाने  केंद्रबिंदू  बनलेल्या अनंत देशपांडे यांच्या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी अनेक तालुक्यातील नागरिक केवळ देशपांडे यांचे सुमधूर गीते ऐकण्यासाठी आल्याचे रसिकांनी सांगितले तर दुसरीकडे देशपांडे यांनी देखील आपल्या जादूई आवाजाने रसीकांना खिळवून ठेवल्याने सादरीकरणात अनेकवेळा देशपांडे यांच्या गितांना वन्स मोअर मिळत असल्याचे चित्र होते.

या कलावंतांना सिंथेसायझरवर सचिन गुडे, ऑक्टोपॅडवर प्रदिप चावरीया, तबल्यावर विशाल पांडे, गिटारवर मयूर यांनी सुरेख साथ दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नासिरखान,मुंबई यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता ये मेरे वतन के लोगो या गीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती विभागीय व्यवस्थापक नितीन काळे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content