योजनेत दीड कोटीच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपींच्या मालमत्तेवर टाच

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शौचालय योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्ह्यातील दोघे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.  पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीसांनी चौकशी सुरू केली असून दीड कोटीचा शासकीय रकमेचा अपहार असल्याने आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात येथील पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेत गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्या विरुध्द दीड वर्षात दीड कोटीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेव्हापासून हे दोघे आरोपी फरार असून पोलिसांची शोध मोहीम सुरु असूनही हे दोघे आरोपी मिळत नसल्याने आता त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी लक्ष्मण पाटील, लेखाधिकारी फकिरा तडवी, ग्राम विस्तार अधिकारी डी एच सोनवणे, ग्राम विस्तार अधिकारी दीपक सदानशिव , ग्रामसेवक कांतीलाल कोळी यांना एपीआय शितलकुमार नाईक यांनी चौकशीसाठी बोलविले होते.

या सर्वांचे लेखी जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. आरोपींना अटक झाल्यावर या प्रकरणात आणखी कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे चौकशीनंतर सिद्ध होणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!