पहूर , ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पहूर येथील वेदांत क्षीरसागर आणि हर्षदा उबाळे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या ) स्पर्धेत पहूर येथिल शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीने २ सुवर्ण पदकांसह तीन रौप्य व चार कांस्य अशा नऊ पदकांची भरीव कमाई करत विभाग स्तरावर भरारी घेतली आहे.
या यशाने पहुरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे .जळगाव येथील शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व इंदिराबाई ललवाणी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असणार्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून विभागावर निवड झाली आहे.
यांनी केली पदकांची कमाई
वेदांत अनिल क्षिरसागर , हर्षदा गुणवंत उबाळे सुवर्ण पदक, दिनेश वासुदेव राऊत , यश वासुदेव राऊत , जयश्री रामचंद्र घोंगडे रौप्य पदक तर हर्षल संतोष उदमले ,सतिष सुनील क्षिरसागर , तृप्ती हिरालाल घोंगडे यांनी कांस्य पदक प्राप्त करून विभागावर निवड झाली आहे . त्यांना सावित्रीबाई फूले माध्य विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रशिक्षक हरीभाऊ राऊत , जामनेर तालुका आर्चरी असोसिएशनचे सचिव श्रीकृष्ण चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशा बद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , इंदिराबाई ललवाणी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चव्हाण उपप्राचार्य किरण मराठे; सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे , जेष्ठ क्रीडा शिक्षक गिरीष पाटील , समीर घोडेस्वार यांनी अभिनंदन केले आहे.