चाळीसगावात आता कुस्तीगीरांसाठी पहिली ‘रेसलिंग मॅट’ !

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी हे चाळीसगाव तालुक्याने दिले आहे. यामुळे या मातीतून अजून महाराष्ट्र केसरी निर्माण व्हावे यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील पहिली “रेसलिंग मॅट’ चाळीसगाव शहरात निर्माण झाली आहे.

खानदेशात कुस्तीगीरांसाठी चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सह अनेक दिग्गज मल्ल या चाळीसगाव तालुक्यातील मातीत घडले आहे. दरम्यान काळ बदलला तशी कुस्तीचे प्रकार बदलले आणि माती सोबतच  मॅटची कुस्ती देशभरात होऊ लागली. शालेय तसेच राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर तर फक्त मॅटचीच कुस्ती होत असल्याने ज्या व्यायाम तालीमीत मॅट असेल तिथे जाण्याचा पैलवानांचा ओघ वाढू लागला. मात्र संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक रेसलिंग मॅट नसल्याने कुस्तीप्रेमींची मोठी निराशा होती.

गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याकडे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद असूनदेखील चाळीसगाव येथे अत्याधुनिक रेसलिंग मॅट उपलब्ध नसल्याने पैलवानांची मोठी गैरसोय होत होती. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चाळीसगाव शहरात रेसलिंग मॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला असून कुस्तीची मोठी परंपरा असणाऱ्या शहरातील हनुमानवाडी स्थित जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला त्यांनी ४ लाखांची रेसलिंग मॅट भेट दिली आहे.

यामुळे जळगाव जिल्ह्यातील हि पहिली रेसलिंग मॅट असून तिचे नुकतेच उद्घाटन आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने तसेच आता मॅटच्या कुस्तीसाठीचे सराव करणे सोपे होणार असल्याने सर्व चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

सदर उद्घाटन प्रसंगी कृषी उतपन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पदाधिकारी मनोहरदास बैरागी पैलवान, दीपक शुक्ला, अण्णा कोळी, अण्णा गवळी, तमाल देशमुख, किरण देशमुख, सतीशनाना पवार, सुधाकर पालवे, माजी नगरसेवक नितीन पाटील, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल,  बबन पवार, आबा पोलीस, जितेंद्र वाघ, संभाजी घुले, कुणाल कुमावत, राहुल पाटील, सचिन दायमा, बंडू पगार, भरत गावडे, संभा पाटील, पिंटू पाटील, रवींद्र शुक्ल व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलेला आश्वासन पूर्ण

मी बोलून नाही तर काम करून दाखवणारा कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीचे संवर्धन करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. काही महिन्यांपूर्वी आमदार केसरी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून तालुक्यातील खेळाडूना मैदान उपलब्ध करून दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून  चाळीसगाव तालुक्याला जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद असूनही एकही रेसलिंग मॅट नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली होती. कुणी काय केले काय नाही केले यात न पडता आपण काय करू शकतो यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय निधीचे आश्वासन न देता एक कर्तव्य म्हणून ४ लाखांची रेसलिंग मॅट जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला उपलब्ध करून दिली आहे. त्याचा तालुक्यातील सर्व मल्लांनी लाभ घ्यावा व पै.विजय चौधरी यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळीसगावचे नाव उंचवावे, पुढील काळात देखील कुस्तीसाठी जे काही करता येईल ती सर्व मदत करेन अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिली.

आमदार मंगेशदादा आम्हा कुस्तीगिरांसाठी देवदूत – पै.बैरागी

आमची व्यायामशाळा ४० वर्षाहून अधिक जुनी असून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुले तालीमीसाठी येतात, आमच्या व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र आता शालेय स्तरावर तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावर मैदानी एवजी मॅटची कुस्ती होत असल्याने चाळीसगाव येथे रेसीलिंग मॅट मिळावी यासाठी आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी मंगेशदादा चव्हाण यांना विनंती केली असता त्यांनी रेसलिंग मॅटचे आश्वासन दिले होते.

निवडणुकीत अनेक पुढारी आश्वासन देतात आणि विसरून जातात हा यापूर्वीचा अनुभव होता. मात्र आमदार झाल्यांनतर मंगेशदादा चव्हाण यांनी आमची वेळोवेळी विचारपूस केली व रेसलिंग मॅट कुठे चांगल्या दर्जाची मिळेल याची चौकशी करण्याचे सांगितले तसेच सदर रेसलिंग मॅट बसविण्याची जबाबदारी देखील आपल्या कार्यकर्त्यांना दिली. आज प्रत्यक्ष मॅट उपलब्ध झाल्याने गेल्या अनेक वर्षांचे आमचे स्वप्न पूर्ण झाले असून जळगाव जिल्ह्यातील पहिली रेसलिंग मॅट चाळीसगाव मध्ये बसल्याने सर्व कुस्तीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. खऱ्या अर्थाने आमदार मंगेशदादा चव्हाण आम्हा कुस्तीगिरांसाठी देवदूत ठरले असल्याची भावना जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पै. मनोहर बैरागी यांनी व्यक्त केली.

Protected Content