तीन दिवसांच्या बंद नंतर कृषी केंद्रांवर वर्दळ

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । कृषी आयुक्तांच्या निषेधार्थ पुकारलेल्या तीन दिवसीय बंद नंतर पहूर येथील कृषी केंद्र संचालकांनी आपले कृषी केंद्र उघडल्यानंतर फवारणीची औषधे, खते खरेदी करण्यासाठी शेतकरी बाधवांनी कृषी केंद्रांवर एकच गर्दी केली.

सोयाबीन न उगविल्या प्रकरणी बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कृषी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध दि. १० ते १२ जुलै दरम्यान कृषी दुकाने बंद ठेवत कृषी केंद्र संचालकांनी १०० टक्के बंद पाळून निषेध नोंदविला. महाराष्ट्र फर्टिलायझर ,पेस्टीसाईड ,सीडस डीलर्स अशोसिएशनच्या निर्णया नुसार पहूर येथील सर्व कृषी केंद्र संचालक बंद मध्ये सहभागी झाले होते. काल सायंकाळी दमदार पाऊस झाल्याने शेतशिवारात कामांना गती मिळाली आहे. खते – फवारणीच्या औषधीसाठी शेतकरी बांधवांची कृषी केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली .

दरम्यान, लॉक डाऊनच्या पार्श्‍वभूमीवर युरीयाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नसल्याने कृषी केंद्रांवर टंचाई जाणवत आहे . युरीयासह इतरही खतांचा तुटवडा असल्याने शेतकरी हैराण होत आहेत. युरीया मिळेल का… युरीया ? अशी आर्त हाक शेतकरी देत असून मागणी तसा पुरवठा होण्याची गरज आहे.

युरिया किंवा इतर खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने खतांची विक्री करणार्‍या साठेबाजांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी सांगीतले. खतांची चढ्या भावाने विक्री होत असल्यास, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्यास संबधित शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Protected Content